पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. शब्द पाळण्याच्या बाबतीत भारतावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. त्यामुळे बीसीसीआयशी करार करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने(पीसीबी) सावध राहायला हवे, असे मत मियाँदाद यांनी व्यक्त केले आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यानची मालिका श्रीलंकेत खेळविण्याचे उभय देशांच्या क्रिकेट मंडळांकडून प्रयत्न सूरू असतानाच जावेद मियाँदाद यांनी पीसीबीला अनाहूत सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, विनाकारण एका गोष्टी मागे धावण्यात काहीच अर्थ नाही. बीसीसीआय सतत आपली भूमिका बदलते. त्यामुळे या क्रिकेटमालिकेतून भरपूर पैसा मिळेल अशी आशाही बाळगू नका. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये क्रिकेट मालिका आयोजनाबाबतीत सामंजस्य करारावर सह्या झाल्या असूनही बीसीसीआय सामने होऊ नयेत यासाठी निमित्त शोधत आहे. त्यामुळे पीसीबीने बीसीसीआयवर विश्वास ठेवू नये.

दरम्यान, मियाँदाद यांनी याआधी उभय देशांमधील क्रिकेट संबंध बिघडण्यास भारतातील नेते आणि मंत्र्यांना जबाबदार धरले होते. क्रिकेटमध्ये पाकिस्तान हा नेहमीच भारतापेक्षा सरस ठरला आहे. भारताचे क्रिकेट हे फक्त पैसा आणि व्यावसायिकीकरण यांच्या बळावर टिकले आहे, असा आरोपही मियाँदाद यांनी केला होता.