टट्टापानी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य दलाचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात सापडला आहे. हा जवान महाराष्ट्राचा असून चंदू बाबुलाल चव्हाण असे त्याचे नाव आहे. आपला नातू पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्याचा धक्का सहन न झाल्याने चंदू चव्हाण यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे गुरूवारी रात्री निधन झाले.
चंदू चव्हाण हे २३ वर्षांचे असून ते मुळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील आहेत. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्समध्ये ते जवान म्हणून कार्यरत आहेत. टट्टापानी येथे ते कार्यरत असून सीमेवर तैनात असताना ते चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले होते. पाकिस्तानी लष्कराने चंदू चव्हाण यांना ताब्यात घेतले. हे वृत्त चव्हाण यांच्या घरी कळाल्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे गुरूवारी रात्री निधन झाले.

बोरविहीर हे धुळे जिल्ह्यातील छोटसं खेडं असून गावाची लोकसंख्या ३२०० इतकी आहे. चंदू हे लहान असतानाच त्यांच्या आई-वडीलांचे निधन झाले. वडील शेती करत होते. त्यामुळे चंदू यांच्यासह त्यांच्या एका भाऊ व बहिणीचे पालनपोषण त्यांच्या मामांनी केले. तीन वर्षांपूर्वी चंदू हे सैन्य दलात भरती झाले अाहेत. त्यांचे प्रशिक्षण अहमदनगर येथे झाले असून सध्या पुंछ येथे ते कार्यरत आहेत. चंदू यांचे भाऊ भूषण हेही सैन्य दलात कार्यरत आहेत. सीमेवर गोळीबार सुरू असताना नजरचुकीने ते पाकिस्तानच्या सीमेत गेले.आजोबा हे निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आहेत.
दरम्यान, टट्टापानी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारानंतर उडालेल्या चकमकीत आठ भारतीय सैनिक मारल्याचा तसेच महाराष्ट्रातील एका सैनिकाला पकडल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला होता. भारतीय सैनिकांचे मृतदेह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच पडून असून गोळीबाराच्या भीतीने भारतीय सैनिकांनी आपल्या सहकाऱ्यांचे हे मृतदेह अद्याप नेलेले नाहीत, असे वृत्त ‘डॉन’ या पाकिस्तानातील प्रतिष्ठित वृत्तपत्राने दिले आहे.