देशाबाहेर पळालेल्या शस्त्र दलाल भंडारीसोबतच्या संबंधांवरून भाजपकडून काँग्रेस लक्ष्य

पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय यांना लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसला बॅकफूटवर ढकलण्यासाठी मंगळवारी भाजपने रॉबर्ट वधेरा अस्त्र बाहेर काढले. देशाबाहेर पळालेल्या शस्त्र दलाल संजय भंडारी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई वधेरा यांच्यातील कथित संबंधांवरून भाजपने काँग्रेसला चांगलेच लक्ष्य केले.

भंडारी आणि वधेरा यांच्यातील व्यावसायिक संबंध, वधेरा यांच्या लंडनमधील वास्तूचे सुशोभीकरण, भंडारींनी काढलेली वधेरांची तिकिटे याबाबतचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपने लगेचच काँग्रेसवर हल्ला चढविला. त्यासाठी खास संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना मुख्यालयात पाचारण केले. त्यांनी काँग्रेसवर प्रश्नांचा चांगलाच भडिमार केला.

‘काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऊठसूट प्रश्न विचारतात. पण स्वत:च्या जावयाच्या ‘कर्तृत्वा’बद्दल काही ट्वीट मात्र केलेले नाही. कधी कधी मौन हे चुकांची कबुली असते, हेच खरे,’ अशी टिप्पणी सीतारामन यांनी केली. ‘वधेरा व भंडारीमधील व्यावसायिक संबंधांचे स्पष्टीकरण काँग्रेस देईल का?’ असा सवाल त्यांनी केला.

‘पिलाटस’ या स्विस कंपनीसाठी विमान खरेदी व्यवहारात दलाली केल्याचा भंडारीवर आरोप आहे. तपास यंत्रणा मागे लागताच त्याने देशाबाहेर पलायन केले. अंमलबजावणी संचालनालयाने त्याच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. भंडारीला पकडून देशात आणण्यासाठी सरकारचे प्रयो चालू असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

जय अमित शहा यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षांत सोळा हजार पटींनी वाढल्याचे वृत्त एका ऑनलाइन माध्यमाने प्रकाशित केल्यानंतर राहुल गांधी यांनी शहांना व मोदींना चांगलेच लक्ष्य केले. ‘नोटबंदीचे एकमेव लाभार्थी’, ‘शाहजादा’, ‘स्टँड अप’ योजनेचे लाभार्थी अशी तिरकस टिप्पणी त्यांनी जय शहांना उद्देशून केली होती. त्या हल्लय़ांनी घायाळ झालेल्या भाजपने वधेरांबाबत मिळालेल्या या नव्या कोलिताने काँग्रेसचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

राहुल गांधी यांच्या काव्यगत स्पष्टीकरणाची आतुरतेने वाटत पाहत आहे..

स्मृती इराणी, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री