तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षातली वादावादी काही काळ शांत झालेली दिसली तरी आता त्या पक्षात नवं वादळ सुरू होण्याची चिन्हं आहेत. जयललितांची भाची दीपा जयकुमार यांनी आज आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर केल्यात.

आपण सक्रीय राजकारणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत देत असतानाच त्यांनी आपण पुढची माहिती २४ फेब्रुवारीला जाहीर करत असल्याचं स्पष्ट केलं. २४ फेब्रुवारीला जयललितांची जयंती आहे.

जयललितांच्या निधनानंतर काही अण्णाद्रमुक मधलं अस्थिर वातावरण जयललितांच्या राईट हँड शशिकलांचा पक्षप्रमुखपदी नेमणूक झाल्यावर काहीसं निवळलं होतं. पण आता दीपा जयकुमार यांच्या निमित्ताने शशिकलांना आव्हान निर्माण होत आहे का अशी परिस्थिती निर्माण होतेय.

लंडनमध्ये एमबीए केलेल्या दीपा जयकुमार यांचे जयललितांशी संबंध चांगले नव्हते. नात्यातल्या असूनही जयललितांनी दीपा जयकुमारना अण्णाद्रमुक मधल्या राजकारणापासून दूर ठेवलं होतं. त्यांना कुठलंही महत्त्वाचं पद कधीच देण्यात आलं नव्हतं. जयललितांचं निधन झाल्यावरही अंत्ययात्रेमध्ये दीपा जयकुमार यांना जयललितांच्या पार्थिवापर्यंत जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. यावेळी त्यांना आणि त्यांच्या पतींना मारहाणही करण्यात आली होती. जयललितांच्या शेवटच्या दिवसांमध्ये दीपा जयकुमार यांना अपोलो हाॅस्पिटलमध्ये त्यांची भेट घेऊ द्यायलाही मज्जाव करण्यात आला होता. हे जयललितांच्या सांगण्यावरूनचं केलं जायचं असा आरोपही त्यांनी केला होता.

याउलट शशिकलांच्या ताब्यात एवढी सगळी वर्षं प्रचंड राजकीय सत्ता होती. जयललितांच्या त्या उजवा हाच मानल्या जायच्या. जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांच्या ‘हुकूमांची’ अंमलबजावणी करण्याचं काम शशिकलांकडेच असायचं. शशिकलांच्या तामिळनाडूमधल्या नोकरशाहीवर प्रचंड पगडा आहे. कोणतीही बडी फाईल शशिकलांच्या संमतीशिवाय हलत नव्हती. आताही तशीच परिस्थिती आहे. जयललितांच्या निधनानंतर शशिकलांना शह देण्याचा पक्षांतर्गत प्रयत्न झाला होता.

पण काहीही असलं तरी भावनिक मुद्द्यांवर मतदान करणाऱ्या भारतात त्यातही तामिळनाडूमध्ये जयललितांच्या नात्यातल्या एक असण्याचा फायदा दीपा जयकुमार यांना नक्कीच मिळू शकतो. त्यांतही त्यांचं व्यक्तिमत्तव जयललितांशी खूप मिळतंजुळतं आहे. गेले काही दिवस त्यांच्या समर्थकांनी जयललिता स्टाईल साडीमध्ये असणारी त्यांची छबी संपूर्ण तामिळनाडूमध्ये पोस्टरबाजी करत झळकावली होती. त्यांच्या चेन्नईमधल्या घरातही पक्ष कार्यकर्त्यांचा राबता टप्प्याटपप्याने वाढतो आहे. जयललितांचे राजकीय गुरू आणि अण्णाद्रमुकचे संस्थापक एम जी रामचंद्रन यांची आज शंभरावी जयंती आहे. त्याचं निमित्त साधत दीपांनी राजकीय शड्डू ठोकलाय.

जयललितांच्या निधनांनंतर शशिकलांच्या पक्षांतर्गत वर्चस्वाला शह देण्याचा खूप प्रयत्न झाला होता. पण तो प्रयत्न निष्फळ ठरवत शशिकला पक्षाच्या प्रमुखपदी जाऊन बसल्या. आता दीपा जयकुमार यांच्या राजकारणातल्या पदार्पणाामागे शशिकलाविरोधी असंतुष्ट आहेत की जयकुमार यांना खराच पाठिंबा आहे हे काही दिवसांतच कळेल.