जयललितांची विधानसभेत घोषणा
चेन्नई महानगर क्षेत्रात येत्या २४ फेब्रुवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना बसने मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देत असल्याची घोषणा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी गुरुवारी येथे केली. जयललिता यांचा २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे.
राज्य विधानसभेत याबाबत घोषणा करताना जयललिता म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने अभाअद्रमुकने २०११ मध्ये निवडणुकीत दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासाचे मोफत पास देण्यात येतील, अशी घोषणा आम्ही निवडणूक जाहीरनाम्यात केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करून दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता आम्ही केली आहे, असे त्या म्हणाल्या.
अभाअद्रमुकने गायीचे दूध, मेंढय़ा, मिक्सर, पंखे आणि विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप विनामूल्य देण्याची घोषणा केली होती आणि त्याची अंमलबजावणीही केली. आता ज्येष्ठ नागरिकांना दरमहा दहा वेळा मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
निवडणुकीत दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता आम्ही केली असून त्याव्यतिरिक्त विविध कल्याणकारी योजनाही आम्ही राबविल्या असल्याचे जयललिता यांनी सांगितले त्याचे सत्तारूढ पक्षाने बाके वाजवून जोरदार स्वागत केले.
पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून चेन्नईत मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे, मात्र ही सुविधा वातानुकूलित बससाठी नाही.
या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा दहा टोकन उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांनी बस वाहकाकडे ते टोकन देऊन मोफत प्रवासाचा लाभ घ्यावयाचा आहे. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी परिवहन अधिकाऱ्यांकडे अर्ज भरून ओळखपत्र आणि टोकन घ्यावयाचे आहे.