अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता सोमवारी सहाव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. मुख्यमंत्रीपदाची धुरा हातात घेतल्यावर जयललिता यांनी राज्यातील ५०० दारुची दुकाने बंद करण्याचा आणि दारू विक्रीची वेळ दोन तासांने कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जयललिता यांनी दारूविक्रीला हळूहळू आळा घातला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी शपथविधीनंतर पहिलाच निर्णय दारूविक्रीची ५०० दुकाने बंद करण्याचा घेतला.
तामिळनाडूमध्ये आता दारूची दुकाने दुपारी १२ ते रात्री १० याच वेळेत सुरू राहणार आहेत. आतापर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत दारूची दुकाने सुरू ठेवायला परवानगी होती. मात्र, दारू विक्रीची वेळ दोन तासांनी कमी केल्यामुळे आता दुपारी १२ नंतरच दुकाने उघडता येणार आहेत. केवळ १० तासच ही दुकाने उघडी ठेवता येणार आहेत. त्याचबरोबर दारू विक्रीची ५०० दुकानेही बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे या दुकानांची संख्या ६२२० पर्यंत खाली येणार आहे.
जयललिता यांनी सोमवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल के. रोशय्या यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्याशिवाय एकूण २८ आमदारांना मंत्रीपदाची शपथ यावेळी देण्यात आली.