एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मरिना बीचवर एमजीआर स्मारकाजवळ जयललिता यांच्या पार्थिवावर दफनविधी करणात आला. ‘अम्मा’ला शेवटचा निरोप देण्यासाठी लाखो समर्थकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

सोमवारी रात्री ११.३० वाजता जयललिता यांची प्राणज्योत मालवली. निधन झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास जयललिता यांचे पार्थिव पोएस गार्डन येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून सामान्य जनतेच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. जयललिता यांच्या समर्थकांनी राजाजी हॉलमध्ये मोठी गर्दी केली होती. याठिकाणी एआयएडीएमके पक्षाचे नेतेही उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूदेखील दिवसभर याठिकाणी उपस्थित होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आदी नेतेमंडळींनी जयललिता यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. याशिवाय एआयएडीएमकेचे हजारो कार्यकर्ते जयललिता यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जमले होते. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनीदेखील जयललिता यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

संध्याकाळी राजाजी हॉलपासून जयललिता यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. राजाजी हॉल ते मरिना बीच हे अंतर सुमारे २ किलोमीटर आहे. काचेच्या पेटीत जयललिता यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यांच्या पार्थिवाजवळ शशीकला थांबल्या होत्या. अंत्ययात्रेत एआयएडीएमकेचे सर्व नेते आणि आमदार चालत मरिना बीचपर्यंत गेले. जयललिता यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. मरिना बीचजवळ येताच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. अम्माने आमच्यासाठी खूप काही केले, राज्यात शाळा आणि महाविद्यालय निर्माण केली, आम्हाला शिक्षणांची संधी त्यांनी दिली असे अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या एका तरुणाने सांगितले. तर गोरगरीबांसाठी जयललितांनी विविध योजना राबवल्या, त्या गोरगरीबांच्या अम्माच होत्या असे सांगताना एका कार्यकर्त्याला अश्रू आवरता आले नाही.

मरिना बीचवर जयललिता यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जयललिता यांचे पार्थिव दफन करण्यापूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी पुष्पाचक्र अर्पण करुन जयललिता यांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील पुष्पहार अर्पण केला. पार्थिव दफन करण्यापूर्वी जयललिता यांच्या निकटवर्तीय  शशीकला यांनी त्यांच्या पार्थिवाजवळ चंदन आणि गुलाब ठेवले. यानंतर शोकाकूल वातावरणात त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले.

जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडू राज्यात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, या काळात राज्यातील शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनेही या निमित्त एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांवरचे राष्ट्रध्वज निम्म्यापर्यंत खाली उतरविण्यात आले आहेत.

Live Updates
18:13 (IST) 6 Dec 2016
18:12 (IST) 6 Dec 2016
17:56 (IST) 6 Dec 2016
राहुल गांधी यांनी जयललिता यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
17:50 (IST) 6 Dec 2016
शासकीय इतमामात जयललिता यांच्यावर अंत्यसंस्कार. जवानांकडून जयललिता यांना मानवंदना
17:47 (IST) 6 Dec 2016
राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जयललिता यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण केला.
17:34 (IST) 6 Dec 2016
17:33 (IST) 6 Dec 2016
जयललिता यांचे पार्थिव मरिना बीचवर दाखल
17:20 (IST) 6 Dec 2016
17:19 (IST) 6 Dec 2016
16:46 (IST) 6 Dec 2016
16:42 (IST) 6 Dec 2016
जयललिता यांचे पार्थिव मरिना बीचच्या दिशेने रवाना, रस्त्याच्या दुतर्फा लाखोंची गर्दी.