जयललिता यांची प्रकृती ही कधीच चिंतेचा विषय नव्हती. परंतु सप्टेंबर २०१४ मध्ये ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती असल्याप्रकरणी त्यांना तुरूंगात जावे लागले. तेव्हापासूनच त्यांची तब्येत बिघडण्यास सुरूवात झाली. याप्रकरणी त्या आठ महिन्यानंतर निर्दोष सुटल्या होत्या. जयललिता यांनी नेहमी आपल्या खासगी गोष्टींबद्दल गोपनीयता पाळली. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी कुणालाच डोकावू दिले नाही. त्यामुळे कोणालाच त्यांच्या आरोग्याबाबत जास्त माहिती नाही. सार्वजनिकरित्या जयललिता या २० सप्टेंबर रोजी जनतेसमोर शेवटच्या आल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांतच त्यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी व्यंकय्या नायडू हे चेन्नई विमानतळ मेट्रो स्टेशनवर नव्या मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळीही जयललिता या व्हिडिओ कॉन्फरन्सने जोडल्या गेल्या होत्या. त्या पहिल्यापासूनच आजारी होत्या. त्यादिवशीही त्यांना व्हिलचेअरवर आणण्यात आले होते. तेथूनच व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती, अशी माहिती त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या टीममधील एका अधिकाऱ्याने दिली.
कर्नाटकमधील तुरूंगातून मुक्त केल्यानंतर जयललिता यांची तब्येत वेगाने ढासळू लागली. त्याचवेळी विरोधकांनी त्यांच्या जीवनशैली आणि काम कमी करण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. नुकताच निवृत्त झालेल्या एका सनदी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्या स्वत: मोठ्या जबाबदारीपासून दूर राहू लागल्या. माजी मुख्य सचिव शीला बालाकृष्णनसहित इतर विश्वासू सहकाऱ्यांनीच सरकारची धुरा सांभाळली.

जयललिता यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गत विधानसभा निवडणुकीतील काही घटनांचा उल्लेख केला. त्यांच्या मते, फोर्ट सेंट जॉर्जचा निम्मा रस्ता गाठल्यानंतर त्यांनी अचानक घरी फिरण्यास सांगितले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी चालकाला गाडी वळवण्यास सांगितले. त्यांना त्रास होत होता. त्यानंतर सुमारे ४ तासानंतर त्या आपल्या कार्यालयात जाऊ शकल्या.
२०१५ मध्ये तब्येत बिघडल्यानंतर जयललितांच्या सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये करण्यात आलेल्या बदलाविषयी एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्पन्नपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर मुख्यमंत्री आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वाहनात दोन फुटांचे अंतर ठेवण्यात येत असत. तुरूंगात गेल्यानंतर त्या खूपच अशक्त झाल्या होत्या. त्यानंतर दोन्ही गाडीमधील अंतर एक फूट करण्यात आला. कारण अचानक गरज पडल्यास लगेच मदत पोहोचवण्यात यावी यासाठी ही रचना करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना जास्त वेळ उभा राहता येत नव्हते. सार्वजनिक कार्यक्रमात मंचावर जाण्यासाठी त्या लिफ्टचा वापर करत असत. तिथेही त्या बसूनच भाषण करत.
तुरूंगात त्यांची तब्येत बिघडली. तुरूंगात त्यांनी डॉक्टर्संना भेटण्यासाठी आणि आपल्या औषधांची माहिती सांगण्यास नकार दिल्याचे एका माजी राज्यमंत्र्यांने सांगितले. नंतर काही ज्येष्ठ नेत्यांनी व सनदी अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतरच तेथील डॉक्टरांची भेट घेतली. त्यांच्यासाठी खास बनवलेली खुर्ची तुरूंगात पाठवण्यात आली. त्यांना एकटेपणा वाटू नये म्हणून इतर नेते त्यांच्या तुरूंगाबाहेर झोपत असत. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर जयललिता बदलल्या होत्या. त्यांना जामिनाचा आणि निर्दोष सुटल्याचा आनंद घेता आला नाही, असेही या माजी मंत्र्याने म्हटले.