तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकारी शशिकला नटराजन यांना मुख्यमंत्री बनवले जाणार आहे. परंतु आता अण्णा द्रमुकमध्ये यावरून मतभेदाला सुरूवात झाली आहे. मंगळवारी जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन शशिकला यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. ३३ वर्षे एखाद्या बरोबर राहणे ही मुख्यमंत्रिपदाची पात्रता ठरत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच जयललिता यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसल्याचा आरोप ही त्यांनी केला.
शशिकला यांच्यावर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, शशिकला यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय चुकीचा आहे. लोकांनी त्यांना मत दिलेले नव्हते. शशिकला यांना लोक घाबरत आहेत. पण मला त्यांची भिती वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या.

तामिळनाडूमध्ये अराजकतेचे वातावरण आहे. अनेक लोक चिंतित असल्याचे त्यांनी सांगितले व जयललितांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मी पहिल्या दिवसापासून अपोलो रूग्णालयात जाण्याची मागणी करत होते. परंतु मला आत जाऊ दिले नसल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.
शशिकला यांना विधिमंडळाचे नेता म्हणून निवडल्यानंतर अनेक लोकांना मला फोन केला. मला राजकारणात सक्रीय होण्यासाठी दबाव असल्याचे त्या म्हणाल्या. येत्या २४ फेब्रुवारी म्हणजे जयललिता यांच्या जयंतीदिवशी याची घोषणा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांना २९ डिसेंबर रोजी अण्णा द्रमुकच्या महासचिव म्हणून निवडण्यात आले होते. तर रविवारी त्यांना विधायक दलाच्या नेतेपदी निवडण्यात आले. दीपा यांच्याशिवाय पक्षाचेही काही नेते शशिकला यांच्याविरोधात उतरले आहेत.