चेन्नईमधील पूरपीडितांना देण्यात येणाऱ्या मदत साहित्याच्या पॅकिंगवर मुख्यमंत्री जयललिता यांचे छायाचित्र वापरल्यामुळे अनेक चेन्नईकरांनी संताप व्यक्त केला. आधीच पाणी साठल्यामुळे अनेक जण घरामध्ये किंवा इतरत्र ठिकाणी अडकून पडले होते. त्यातच सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीच्या माध्यमातूनही राजकारण केले जात असल्याचे दिसल्यामुळे अनेकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारनेही हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता विचारात घेऊन लगेचच प्लॅस्टिकच्या कोऱ्या पिशव्यांमधून मदत साहित्य वितरित करण्यास सुरुवात केली.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू बंदिस्त मैदानात मदत साहित्याचे पॅकिंग करण्यात येत होते. त्यावेळी जयललिता यांचे छायाचित्र असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा त्यासाठी वापर करण्यात आला. या पिशव्यांमध्ये बिस्किटे, मेणबत्त्या, नूडल्स, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी साहित्य भरण्यात आले. सुरुवातीचे दोन दिवस जयललिता यांचे छायाचित्र असलेल्या पिशवीमध्ये पॅकिंग करण्यात आले. मात्र, चेन्नईमध्ये त्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर लगेचच रविवारपासून प्लॅस्टिकच्या कोऱ्या पिशव्यांमध्ये मदत साहित्याचे पॅकिंग करण्यात येऊ लागले.