तामिळनाडूच्या जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांची ऋणी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी राज्यातील जनतेच्या भल्यासाठी कार्यरत राहीन, अशी प्रतिक्रिया तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी गुरुवारी दिली. तामिळनाडूतील जनतेने १९८४ नंतर पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाला पुन्हा निवडून दिले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता यांनी मतदारांचे मनापासून आभार मानले.
त्या म्हणाल्या, राज्यातील जनतेच्या कल्याणाशिवाय माझे दुसरे कोणतेही ध्येय नाही. माझे आयुष्य मी तामिळनाडूसाठीच वाहिले आहे. त्याचबरोबर येथील जनतेनेही माझ्यावर कायम विश्वास दाखवला आहे. १९८४ नंतर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा निवडणूक जिंकता आलेली नाही. या यशाबद्दल मी माझ्या कार्यकर्त्यांचे पक्षातील नेत्यांचे आभार मानते. पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या सर्व आश्वासनाची मी नक्कीच पूर्तता करेन आणि त्याच माध्यमातून मी लोकांचे ऋण फेडेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.