‘एलटीटीई’चा प्रमुख प्रभाकरन् याच्या १२ वर्षांच्या मुलाला देहदंडाची शिक्षा देणे हे श्रीलंकेच्या शासनाचे अमानवी कृत्य आह़े, अशी टीका करीत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी, मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या श्रीलंकेच्या शासनाविरोधात भारताने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आह़े  तसेच जिनिव्हा येथे येत्या मार्चमध्ये होणाऱ्या यूएनएचआरसीच्या बैठकीत अमेरिकेकडून मांडण्यात येणाऱ्या, मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणाऱ्या ‘लंका- स्पेसिफिक रिझोल्यूशन’ला भारताने पाठिंबा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आह़े
प्रभाकरन्चा मुलगा अगदी लहान वयाचा होता़  त्याने कोणताही गुन्हा केलेला नव्हता़  परंतु केवळ तो प्रभाकरन्चा मुलगा होता़  म्हणून त्याला निष्ठुरपणे ठार करण्यात आल़े  या घटनेमुळे अशा प्रकारच्या आणखी घटना श्रीलंकेतील सध्याच्या शासनाच्या काळात घडल्या असल्याचाच पुरावा आहे, असाही आरोप त्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला़  तसेच या घटनेची तुलना त्यांनी हिटलरने जर्मनीत ज्यूंच्या केलेल्या हत्याकांडाशी केली़  या युद्धखोरीच्या गुन्हांमधील सर्व आरोपींवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटले भरण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली़