शरद यादव यांनी संयुक्त जनता दलाला (जदयू) सोडचिठ्ठी देऊन लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षात सहभागी व्हावे, असा सल्ला ‘जदयू’च्या एका पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे शरद यादव यांची आता पक्षाला गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘शरद यादव हे लवकरच लालूंच्या कुटुंबीयांचे काका होतील’ अशा उपहासात्मक शब्दांत ‘जदयू’चे प्रवक्ते नीरजकुमार यांनी त्यांना टोला लगावला.

शरद यादव यांनी कोणताही विलंब न करता ‘राजद’मध्ये औपचारिकरित्या सहभागी होऊन पक्षाचे कंदील हे चिन्ह स्विकारावे, असा सल्लाही नीरज कुमार यांनी शरद यादव यांना दिला. निवडणूक आयोगाने कालच शरद यादव यांचा दावा फेटाळत तुमच्या नव्हे तर नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील ‘जदयू’च खरा पक्ष असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नीरजकुमार यांनी शरद यादव यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नीरजकुमार यांनी म्हटले आहे की, आपले राजकीय अस्तित्त्व कायम राखण्यासाठी आता शरद यादवांना ‘राजद’त सहभागी होण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. लवकरच त्यांना राज्यसभा सदस्यत्वही गमवावे लागणार आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या लालूंच्या कुटुंबीयांत आता शरद यादव यांचाही समावेश होईल, असेही त्यांनी म्हटले.

तर ‘जदयू’चे बंडखोर नेते खासदार अली अन्वर यांना यापूर्वीच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नोटीस पाठवली आहे. यामध्ये पक्षाने दाखल केलेल्या याचिकेनुसार तुम्हाला राज्यसभेच्या सदस्यत्त्वासाठी अपात्र का ठरवू नये, असा सवाल विचारण्यात आला आहे. याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

२७ ऑगस्ट रोजी लालू प्रसाद यादव यांच्या ‘देश बचाओ, बीजेपी भगाओ’ या रॅलीत शरद यादव यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर ‘जदयू’ने त्यांना दोन आठवड्यांची मुदत देत स्वतःहून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, अशी सूचना केली होती.