पाटणा येथून बिहारच्या उत्तरेकडे जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा नदीवरील म. गांधी सेतूच्या देखभालीवरून बुधवारी सत्तारूढ जद(यू) आणि भाजपने एकमेकांवर जोरदार आरोप केले.
सभागृहात शून्य प्रहराला भाजपचे अरुण शंकर प्रसाद यांनी हा प्रश्न उपस्थित केला. राज्य सरकार या प्रश्नावर राजकारण करीत असून केंद्र सरकारला सहकार्य करीत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव यांनी केला.
रस्ते बांधकाममंत्री राजीव रंजनसिंह लल्लन यांनी याबाबत केंद्र सरकारवर आरोप केला. केंद्र सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असून भाजप त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे लल्लन म्हणाले. सेतूच्या दुरुस्तीच्या कामासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक तितका निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.