बिहारमधील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीसाठी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपचा विजय निश्चित असल्याचे विधान केले आहे. जदयूने एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी हे विधान केले. जदयू ज्या पक्षाला साथ देणार त्या पक्षाचा विजय निश्चित असतो असे त्यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये शनिवारी संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नितीशकुमार यांनी उपस्थितांना संबोधित केले. पक्षातील नाराज नेते शरद यादव यांनादेखील त्यांनी आव्हान दिले. ‘जर तुमच्याकडे समर्थन असेल तर दोन तृतियांश सदस्यांच्या मदतीने पक्ष फोडा अन्यथा प्राथमिक सदस्यत्व गमावण्याची तयारी ठेवा असे आव्हानच त्यांनी दिले. विधानसभेतील ७१ आमदार, विधान परिषदेतील ३० आमदार आणि दोन खासदार माझ्याबरोबर आहेत, असा दावा त्यांनी केला. शरद यादव यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. पण तुम्ही राष्ट्रीय जनता दलाच्या बळावर जदयू फोडणार का? असा संतप्त सवालच त्यांनी विचारला.

नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावरही टीका केली. तुम्ही भ्रष्टाचार कराल आणि त्यावर पडदा टाकण्यासाठी धर्मनिरपेक्षता आणि जनादेशाचे दाखले द्याल असा टोलाही त्यांनी लगावला. बिहारच्या विकासासाठी जनतेने महाआघाडीला मतदान केले. एखाद्या कुटुंबाच्या विकासासाठी जनादेश मिळाला नव्हता असेही त्यांनी सांगितले. लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंह यादव या दोघांनी माझी नेतेपदी निवड केली होती अशी आठवण त्यांनी करुन दिली. भाजपशी युती करण्याचा निर्णय आम्ही बिहारच्या विकासासाठी घेतला. आता केंद्र आणि बिहारमध्ये एकच सरकार असून बिहार आता विकासाची नवी उंची गाठेल असा दावा त्यांनी दिला.