मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ‘गद्दार’ संबोधणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जनता दलाने (संयुक्त) जोरदार हल्ला चढविला आहे. तुम्ही दिदी आहात हे लक्षात ठेवा, दादासारखे वागू नका, असा खोचक टोला जदयूने ममतांना लगावला आहे. ममता या दिदीच्या रूपात चांगल्या दिसतात. त्यांनी दादासारखे वागता कामा नये, असे जदयूचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी म्हटले. सरकारने ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ३० नोव्हेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी ममतांना नितीश यांच्यावर थेट टीका केली नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वी पाटणा येथील जाहीर कार्यक्रमात ममतांनी नितीश यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जे गद्दारी करतील, त्यांना जनता माफ करणार नाही, असे ममतांनी म्हटले होते. या टीकेला के.सी. त्यागी यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी तृणमुल काँग्रेसला घोटाळेबाजांचा पक्ष म्हटले. पश्चिम बंगालमध्ये चीटफंडाचा पैसा मोठ्याप्रमाणावर आहे. जुन्या नोटा रद्द झाल्याने हा पैसा वाया जाणार आहे. हा पैसा जमेस धरण्यात आलेला नाही. त्याला कर लावलेला नाही. त्यामुळे त्याची सत्यता तपासली पाहिजे, अशी मागणी जदयूचे प्रवक्ते त्यागी यांनी केली आहे.

नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केल्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नितीशकुमार यांची भाजपसोबत जवळीक वाढत चालली आहे, अशी जोरदार चर्चा राष्ट्रीय राजकारणात रंगली होती. मात्र, माझे विरोधक अशाप्रकारचा अपप्रचार करून माझा राजकीय बळी देऊ पाहत, असा दावा नितीशकुमार यांनी केला होता. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष एकजुटीने उभे ठाकले असताना, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले होते. याच पार्श्वभूमीवर नितीश आणि अमित शहा यांच्यामध्ये गुरगावच्या फार्म हाऊसमध्ये झालेल्या कथित भेटीची सध्या राजधानीत गरमागरम चर्चा आहे. मात्र, नितीश कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून विरोधकांकडून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते.

यापूर्वी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीदेखील ममतांना टीकेचे लक्ष्य केले होते. नोटाबंदी व पश्चिम बंगालमध्ये सैन्य तैनात केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारशी संघर्ष सुरू आहे. मात्र, अशा टोकाच्या भूमिका घेणाऱ्या ममता बॅनर्जींनी स्वत:वर उपचार करून घेण्यासाठी चांगला डॉक्टर शोधण्याची गरज असल्याचा टोला सुब्रमण्यम स्वामी यांनी लगावला होता.