बिहारमध्ये राजद आणि जदयू यांच्यातला वाद संपता संपताना दिसत नाहीये. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असं म्हणत जदयूनं राजदला इशाराच दिला आहे. सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या वागण्याबोलण्यात फरक झाला आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जातो आहे मात्र आम्ही आता हे सहन करणार नाही. तेजस्वी यादव यांनी कानात कापसाचे बोळे घातले आहेत का? हा प्रश्न मला विचारायचा आहे कारण जदयूला काय म्हणायचं आहे ते त्यांना ऐकूनच घ्यायचं नाहीये. शांत बसण्याऐवजी त्यांनी समोर यावं आणि सत्य काय आहे ते सांगावं अशी मागणी आता जदयूचे नेते अजय आलोक यांनी केली आहे.

महाआघाडी एकसंध आहे मात्र भाजप लोकांची दिशाभूल करत आहे असा दावा तेजस्वी यादव यांनी गुरूवारी केला होता. मात्र जदयूतल्या लोकांना काय वाटतं हे विचार करून राजदनं निर्णय घ्यायला पाहिजे असं मत जदयू प्रवक्ते राजीव रंजन यांनी व्यक्त केलं होतं. जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिल्यापासून या दोन पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

दरम्यानच्या काळात लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या मालमत्तांवर सीबीआयनं छापेमारी केली आहे त्यामुळे तर राजद आणि जदयू यांच्यातली दरी आणखीनच वाढलेली दिसून आली आहे. जदयूकडून सातत्यानं तेजस्वी यादवांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. मात्र तेजस्वी यादव राजीनामा द्यायला तयार नाहीत त्यामुळेच हा वाद आणखी चिघळला आहे.

आता आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका म्हणत जदयूनं राजदला जणू अंतिम इशाराच दिला आहे. मात्र आता यावर राजद काय भूमिका घेणार यावर महाआघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. १५ जुलै रोजी झालेल्या शासकीय कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनी हजेरी लावली नव्हती. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शेजारची खुर्ची तेजस्वी यादव यांच्यासाठी ठेवण्यात आली होती. पण तेजस्वी यादव आलेच नाहीत म्हणून ही खुर्ची हलवण्यात आली.

यानंतर दोन्ही पक्षांमधली दरी वाढल्याची चर्चा पुन्हा रंगली होती. आता अजय आलोक यांनी केलेल्या टीकेमुळे या दोन पक्षांमधला वाद संपला नाही हे पुन्हा समोर आलं आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे एकेकाळचे घट्ट मित्र मानले जातात मात्र या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्यातही दुरावा निर्माण झाला आहे. आता हा तिढा नेमका सुटणार कसा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे