आयआयटी किंवा एनआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई प्रवेश परीक्षेमध्ये उदयपूरचा कल्पित वीरवाल पैकीच्या पैकी गुण मिळवून देशात पहिला आला आहे. या परिक्षेच्या दुसऱ्या फेरीमध्ये त्याने ३६० पैकी ३६० गुण मिळवले आहेत. कल्पितचे वडिल सरकारी दवाखान्यामध्ये सहाय्यकाचे काम करतात असे हिंदुस्तान टाइम्सने म्हटले आहे.

कल्पितच्या प्राचार्यांनी त्याला फोन करुन सकाळीच ही बातमी दिली. जेईई मुख्य परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणारा तू प्रथम उमेदवार असल्याचे त्यांनी त्याला म्हटले. हे ऐकून आपण आनंदित झालो आहोत परंतु पुढील महिन्यात जेईई अॅडवांस ही परीक्षा आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे असे त्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. त्याने नुकताच बारावीची परीक्षा दिली आहे. कनिष्ट महाविद्यालय आणि कोचिंग क्लासमध्ये घेण्यात येणाऱ्या अभ्यासाव्यतिरिक्त मी घरी पाच सहा अभ्यास करत होतो असे कल्पितने म्हटले.  त्याने या परीक्षेची तयारी ८ वी पासून सुरू केली होती.

रेसोनंस एज्युवेंचर या कोचिंग क्लासेसमध्ये तो आठवीपासून शिकवणी घेत होता असे त्याने सांगितले. माझ्या आई वडिलांनी माझी इतकी काळजी घेतली की मी कधी आजारी पडलो नाही. त्यामुळे माझे तास कधीच बुडले नाहीत असे त्याने सांगितले.
कल्पितचे वडिल पुष्कर लाल वीरवाल हे उदयपूरच्या महाराणा भूपाल सरकारी रुग्णालयामध्ये सहाय्यक आहेत तर त्याची आई सरकारी शाळेमध्ये शिक्षिका आहे. अभ्यासाव्यतिरिक्त त्याला क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळण्याची आवड आहे. त्याची आयआयटी मुंबई येथे कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेण्याची इच्छा आहे.

अभ्यासावेळी तू स्मार्टफोन आणि सोशल मिडियापासून दूर होतास का असे विचारले असता तो म्हणाला मी स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर माहिती गोळा करण्यासाठी केला असे कल्पितने म्हटले.  ही प्रवेश परीक्षा २ एप्रिल रोजी झाली होती. देशातील एकूण १०.२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २.२० लाख विद्यार्थी जेईई अॅडवांस साठी पात्र ठरले आहेत. पुढील परीक्षा २१ मे रोजी होणार आहे.