जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा दहशतवादी असून त्याने पाकिस्तानातही बॉम्बस्फोट केल्याचे सांगत माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करू नये म्हणून पाकिस्तान चीनच्या माध्यमातून या प्रस्तावाला विरोध करत आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेवर त्यांनी टीका केली आहे. चीनला या प्रकरणात का ओढत आहात असा सवाल त्यांनी केला आहे.
न्यूज नेशन या वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात त्यांनी आपली मते व्यक्त केली. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासंबंधी एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात प्रलंबित आहे. परंतु त्याला दहशतवादी घोषित करण्यासाठी पर्याप्त पुरावे नसल्याचे कारण देत चीन या प्रस्तावाला विरोध करत आहे. त्यामुळे या प्रकरणात चीनला सहभागी करून घेण्यात काहीच अर्थ नसल्याचे ते मुशर्रफ म्हणाले.
गुरूवारी (दि. २७) दिल्लीत भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला गुप्तहेरीप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. यासंबंधी मुशर्रफ यांना विचारल्यानंतर त्यांनी प्रारंभी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचे म्हटले. नंतर यात सत्यता असेल तर अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

पाकिस्तान आंतरराष्ट्रीयस्तरावर कूटनीतीमध्ये कमी पडत असल्याचे मान्य केले. परंतु तरीही पाकिस्तानला कोणीही कमी लेखू नये असा इशाराही दिला. तसेच पाकिस्तानच्या प्रगतीसाठी लष्कराच्या हाती सत्ता गरजेची असल्याचे समर्थन केले. लष्कराच्या हाती जेव्हा-जेव्हा सत्ता होती तेव्हाच पाकिस्तानचा विकास झाल्याचे त्यांनी म्हटले.
पाकिस्तानचे लष्कर मजबूत असून आण्विक शस्त्रांनी सज्ज आहे. त्यामुळे पाकला कोणी वारंवार धमकी देऊ शकत नाही असेही भारताचे नाव न घेता इशारा दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडे पुढे केलेला हात हे नाटकीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला.