देशातील दुसरी मोठी विमान कंपनी असलेली जेट एअरवेज वैमानिकांच्या पगारात मोठी कपात करणार आहे. दैनंदिन खर्चात कपात करण्यासाठी जेट एअरवेजने वैमानिकांच्या पगारात तब्बल ३० ते ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जेट एअरवेजच्या कनिष्ठ दर्जाच्या वैमानिकांच्या पगारात मोठी घट होणार आहे. विशेष म्हणजे पगार कपातीसाठी तयार राहा, अन्यथा नोकरी सोडा, अशा थेट सूचना जेट एअरवेजकडून देण्यात आल्या आहेत. इकॉनॉमिक टाईम्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

दैनंदिन खर्चात कपात करण्यासाठी जेट एअरवेजचे प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वैमानिकांच्या पगारात कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी कंपनीने यंदाच्या महिन्याच्या सुरुवातीला वैमानिकांना पत्र पाठवले होते. यामध्ये पगार किंवा स्टायपेंडमधील कपातीसाठी तयार राहा, असा इशारा कंपनीकडून देण्यात आला होता. दैनंदिन खर्चात कपात करुन त्या पैशांचा वापर नेटवर्कचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी वापरण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

जेट एअरवेजमध्ये करण्यात येणाऱ्या पगार कपातीच्या प्रक्रियेचा भाग असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी १ ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. याचा फटका जवळपास ४०० वैमानिकांना बसणार आहे. यासोबतच आखाती देशांमधील सेवेवर कंपनीकडून अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. आखाती देशांमध्ये जाणाऱ्या विमानांची संख्या कंपनीकडून वाढवली जाणार आहे.

वैमानिकांच्या पगारात कपात करण्याच्या वृत्तावर अद्याप कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इंडिगो आणि स्पाईसजेट या कंपन्या जेट एअरवेजच्या तुलनेत स्वस्तात सेवा देत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कंपनीला मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या उत्पन्नात मागील काही महिन्यांमध्ये मोठी घट झाली आहे. इतिहाद कंपनीची मालकी असलेल्या जेट एअरवेजला आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलदरांमुळे मोठा तोटा सहन करावा लागला आहे.