प्रसिध्द गायक सोनू निगमला विमानात गाण्याची परवानगी देणं जेट एअरवेजच्या ५ हवाई सुंदरींना चांगलंच महागात पडले आहे. सोनू निगमला गायनाची परवानगी देणा-या पाचही हवाई सुंद-यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना निलंबित करण्यात आलेय.
४ जानेवारीला सोनू निगम जोधपूरहून मुंबईला जात होता. त्यावेळेस विमानातील काही प्रवाशांनी सोनूला गाण्याचा आग्रह केला होता. त्यावर विमानातील हवाई सुंदरींनीही सोनूला विमानाच्या अॅड्रेस सिस्टिमवरून गाण्याची परवानगी दिली होती.  नंतर सोनूने ‘वीर झारा’ मधील ‘दो पल रुका ख्वाबों का कारवां…’ आणि ‘रिफ्युजी’ चित्रपटातील पंछी नदियां पवन के झोंके…’ ही गाणी गायली.  मात्र विमानात झालेल्या या घटनेचा व्हिडीओ काही प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सदर गोष्टीचे गांभीर्य ओळखून डीजीसीएने विमान कंपनीला संबंधित हवाई सुंदरींना निलंबित कऱण्याचे आदेश दिले.
हवाई सुंदरींना गाण्यामुळे किंवा नृत्यामुळे निलंबित करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी एका खासगी एअरलाईनने विमानातील क्रूला ‘बलम पिचकारी’ गाण्यावर नृत्य करण्यामुळे निलंबित केले होते.