झारखंडमधील एका शाळेच्या कार्यक्रमात तेथील शिक्षणमंत्री नीता यादव यांनी २२ जुलै रोजीच माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या तसबिरीला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली होती.
हा प्रकार त्यांनी अज्ञानातून केला असणे शक्य आहे. तरी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना आपले माजी राष्ट्रपती व मुलांचे लाडके वैज्ञानिक कलाम अद्याप जिवंत आहेत याचा थांगपत्ता नसावा, यातूनच आपल्या देशातील शिक्षण, त्याची धुरा ज्या मंत्र्यांकडे, नेत्यांकडे असते त्यांचा वकूब नेमका किती असावा याची साक्ष पटते. विशेष म्हणजे त्यानंतर चारच दिवसांच्या अंतराने कलाम यांचे सोमवारी निधन झाले.
कवी कुसुमाग्रज यांनी एका कवितेत म्हटले आहे, महापुरुषांना मरण असते दोनदा, एकदा भक्तांकडून व नंतर वैऱ्यांकडून. कलाम यांना कुणी वैरी नव्हते, पण भक्तांनी मात्र त्यांना जिवंतपणीच मारण्याचा अज्ञानीपणा दाखवला.
या घटनेची सामाजिक संकेतस्थळांवर जोरदार चर्चा असून, झारखंडमध्ये या कार्यक्रमाच्या बातम्या छायाचित्रासह प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यात कलाम यांच्या तसबिरीला भलाथोरला हार घातलेला दिसत आहे, त्यामुळे ही गोष्ट खोटी असण्याची शक्यता नाही. झारखंडच्या शिक्षणमंत्री नीता यादव यांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावून कलाम यांच्या छायाचित्रास पुष्पहार घातला होता.
झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात गेल्या सोमवारी सरस्वती विद्या मंदिर शाळेत नीता यादव या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कलाम यांच्या तसबिरीस कुंकू लावून पुष्पहारही अर्पण केला. त्यानंतर नीता यादव यांनी स्मार्ट क्लासचे उद्घाटन केले होते. भाजपचे आमदार मनीष जयस्वाल, शिक्षक उमेश प्रसाद यांच्यासमवेत अनेक लोक या वेळी उपस्थित होते.