देशभरात जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांना कथित गोरक्षकांकडून मारहाणीच्या घटना घडत असतानाच आता झारखंडमध्ये एका घराबाहेर मृत गाय आढळल्यानं संतप्त जमावानं एका मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतकंच नव्हे तर जमावानं त्याचं घरही पेटवलं. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यात एक जणजखमी झाला आहे.

गिरिडीह जिल्ह्यातील देवरी पोलीस ठाण्यातील हतियातंड येथे मंगळवारी संध्याकाळी उस्मान अन्सारी या मुस्लिम तरुणाच्या घराबाहेर मृत गाय आढळली. यामुळं संतप्त झालेल्या जमावानं अन्सारी याला बेदम मारहाण केली. तसंच त्याचं घरही पेटवून दिलं. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अन्सारीच्या घराबाहेर प्रचंड जमाव जमला होता. तसंच त्यांनी अन्सारीला मारहाण केली. तसंच घरालाही आग लावली होती. पोलिसांनी मोठ्या धाडसानं जमावाला पांगवलं आणि आगीच्या विळख्यात सापडलेल्या घरातून अन्सारी आणि त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढलं. मारहाणीत जखमी झालेल्या अन्सारीला रुग्णालयात नेताना पुन्हा जमाव संतप्त झाला आणि त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळं जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला, अशी माहिती झारखंड पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी हवेत केलेल्या गोळीबारात कृष्णा पंडित हा जखमी झाला आहे. तर जमावानं केलेल्या दगडफेकीत जवळपास ५० पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाणीत जखमी झालेल्या अन्सारी आणि गोळीबारात जखमी झालेल्या पंडित याच्यावर धनबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु असून, दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या गावातील वातावरण तणावपूर्ण असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.