काश्मीर खोऱ्यातील पूर आता ओसरू लागला असून हवामान सुधारल्याने झेलम नदीची पाण्याची पातळी कमी होत आहे. दरम्यान पुरात मरण पावलेल्यांची संख्या बदगाम जिल्ह्य़ात आणखी सहा मृतदेह सापडल्याने १६ झाली आहे.
झेलम नदीची पाण्याची पातळी दक्षिण काश्मीरमध्ये संगम येथे १६.४५ मीटर होती २४ तासांपूर्वी ती २२.८० फूट होती. राममुन्शी बाग येथे पाण्याची पातळी दीड फुटांनी कमी झाली असून ती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. हवामान ढगाळ असले तरी येत्या चोवीस तासात पावसाची शक्यता नाही. उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान केंद्र सरकारने सांगितले की, जम्मू-काश्मीर मधील स्थिती गेल्या वर्षी इतकी गंभीर नव्हती पण अधिकाऱ्यांनी परिस्थितीबाबत सतर्कता दाखवली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बदगाम जिल्ह्य़ात लादेन खेडय़ात सहा मृतदेह सापडले असून, मृतांची एकूण संख्या १६ झाली आहे. एक जण दरडी कोसळल्याने मरण पावला. बदगाममध्ये मातीचे ढिगारे कोसळून चार घरांचे नुकसान झाले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी सांगितले की, उधमपूरमध्ये दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला. जम्मूतही काही प्रमाणात पूर आला असावा. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने काश्मीरमध्ये धाव घेतली आहे.
शनिवार व रविवारी जोरदार पावसाने झेलम व तिच्या त्रिभुज प्रदेशातील नद्यांची पाण्याची पातळी वाढली होती त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. काश्मीर खोऱ्यात शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या असून काश्मीर विद्यापीठाच्या परीक्षा पूरस्थिती सुधारल्याने ठरल्यावेळीच होणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसने पुनर्वसनात सरकारने दिरंगाई केल्याचा आरोप विधानसभेच केला.