शबाब जिहादींनी सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे एका बंदरावरील रेस्टॉरंटमध्ये केलेल्या हल्ल्यात सात जण ठार झाले आहेत. दोन हल्लेखोरही चकमकीत मारले गेले आहेत. मोगादिशू शहराचे प्रवक्ते अबिफताह हलान यांनी सांगितले, की नऊ जणांना शबाबच्या दोन बंदूकधाऱ्यांनी ठार केले. अल-काईदाशी संबंधित शबाब जिहादींनी बंनादिर रेस्टॉरंटमध्ये हा हल्ला केला. सुरक्षा दलांशी झटापट होण्याच्या आधी त्यांनी बॉम्बस्फोट केले.

हे रेस्टॉरंट तरुण  लोक व सरकारी अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय असून गोळीबाराच्या वेळी वीस जण रेस्टॉरंटमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. सकाळी अधिकाऱ्यांनी सांगितले, की हल्लेखोर मारले गेले आहेत. हल्लेखोरांना रेस्टॉरंटमध्ये सरकारी दलांच्या सैनिकांनी ठार मारले, अशी माहिती प्रादेशिक पोलिस कमांडर कर्नल अबशिर बिशार यांनी ‘सोमाली नॅशनल न्यूज एजन्सी’ला दिली. दहशवादी हल्ल्यात नऊ जण ठार झाले. त्यातील पाच नागरिक तर दोन सुरक्षा दलांचे जवान होते. हल्ला करणारे दोन दहशतवादीही चकमकीत मारले गेले तर दोन नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांनी लिडो बंदराच्या परिसरात या वर्षी दुसरा हल्ला केला. तेथे अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंट आहेत. उद्योजक व सोमाली लोकांमध्येही खाण्यापिण्याची ही ठिकाणे लोकप्रिय आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये मोगादिशूत निवडणुका होत आहेत.

 

तुर्कस्तानमधील आत्मघातकी ट्रक बाँबस्फोटात ११ पोलीस ठार

इस्तंबूल : तुर्कस्तानमध्ये शुक्रवारी करण्यात आलेल्या एका आत्मघातकी ट्रक बाँबस्फोटात ११ तुर्किश पोलीस अधिकारी ठार, तर ७८ जण जखमी झाले. तुर्कस्तानने शेजारच्या सीरियामध्ये जिहादी व कुर्दिश सेनेविरुद्ध दुहेरी आक्रमण केल्यानंतर तीन दिवसांतच झालेल्या या हल्ल्याचा संशय कुर्द बंडखोरांवर आहे.

शुक्रवारी सकाळी झालेल्या या स्फोटात सीरियन सीमेच्या उत्तरेकडे असलेले आग्नेय तुर्कस्तानमधील सिझर शहरातील पोलीस मुख्यालय जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सव्वा नऊ वाजता पीकेके दहशतवादी गटाने स्फोटकांनी भरलेल्या एका वाहनाने दंगलविरोधी पोलिसांच्या इमारतीवर आत्मघातकी हल्ला केला, असे प्रांतीय राज्यपालांच्या कार्यालयाने एका निवेदनात सांगितले. या स्फोटात ११ पोलीस अधिकारी ठार झाले, तर ३ नागरिकांसह ७८ लोक जखमी झाले असून त्यापैकी चौघे गंभीर अवस्थेत आहेत, असे आरोग्यमंत्री रेसेप अकदाग यांनी सांगितले. तुर्की सैन्याने सीरियातील कुर्दिश सेनेच्या ताब्यात असलेल्या भागांवर बाँबहल्ले केल्यानंतर काही तासांतच हा स्फोट घडून आला. सिझरमधील स्फोटात पोलीस मुख्यालयाच्या चार मजली इमारतीचा पुढील भाग उडाला व त्यामुळे जाड काळ्या धुराचे ढग दिसू लागले. लगतच्या इमारतींचेही अतिशय नुकसान झाले.