भारतीय दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना धक्का दिल्यावर आता रिलायन्स जिओ कॅब सेवा सुरू करणार असल्याची चर्चा आहे. ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओ अॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे टॅक्सी सेवा क्षेत्रातील स्पर्धा आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप रिलायन्स जिओकडून याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

रिलायन्स जिओला एप्रिल महिन्यात अॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू करायची होती. मात्र ही सेवा व्यावसायिक स्वरुपात सुरू करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती अनेक संकेतस्थळांनी दिली आहे. मात्र रिलायन्स जिओने टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

अॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्स जिओची महिंद्रा आणि ह्यंडईसोबत बातचीत सुरू असल्याचे वृत्त फॅक्टर डेली नावाच्या संकेसस्थळाने प्रसिद्ध केले आहे. यासोबतच टॅक्सी सेवेचे भाडे निश्चित करण्यासाठी रिलायन्स जिओची ई अँड वाय या सल्लागार कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. रिलायन्स जिओची टॅक्सी सेवा सुरू झाल्यास कंपनीकडून जिओ सीमसारख्या मोफत ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

बंगळुरु आणि चेन्नईमध्ये रिलायन्स जिओकडून अॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यात येईल. यानंतर लगेचच ही सेवा दिल्ली आणि मुंबईतही सुरू केली जाईल. दिल्ली आणि मुंबईनंतर भोपाळ आणि जयपूरसारख्या छोट्या शहरांमध्ये रिलायन्स जिओकडून टॅक्सी सेवा सुरू केली येणार असल्याचे वृत्त आहे. जिओकडून उबरसारख्या अॅपवरदेखील काम सुरू आहे. यामध्ये पेमेंट करण्यासाठी जिओ मनी अॅपचा वापर करण्यात येईल. रिलायन्स जिओने नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिओ मनी अॅपची सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वीच जिओ मनीने वॉलेट अॅपसाठी ओलासोबत हातमिळवणी केली आहे.

रिलायन्स जिओच्या दूरसंचार सेवेमुळे या क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रिलायन्स जिओसोबत स्पर्धा करण्यासाठी व्होडाफोन आणि एअरटेलला डेटा पॅकच्या दरांमध्ये मोठी कपात करावी लागली आहे. जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेलकडून टेलिनॉरची खरेदी करण्यात येणार आहे. तर व्होडाफोन आणि आयडियाने हातमिळवणी केली आहे.