पनामा पेपर्स गैरव्यवहारप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणीत आता आणखीनच भर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीकडून आता नवाझ शरीफ यांची कन्या मरिअम हिला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मरिअम पहिल्यांदाच संयुक्त समितीपुढे (JIT) चौकशीसाठी हजर राहणार आहे. मरिअम त्यांच्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यासाठी सध्या लंडनमध्ये गेल्या आहेत. मात्र, ५ जुलैपूर्वी त्यांना चौकशी समितीपुढे हजर व्हावे लागणार असल्याचे वृत्त ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिले आहे. काही दिवसांपूर्वीच चौकशी समितीकडून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चौकशी करण्यात आली होती. पदावर असताना एखाद्या चौकशी समितीसमोर हजर होणारे ते पाकिस्तानचे पहिलेच पंतप्रधान ठरले होते. त्यावेळी मरिअमने शरीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छायाचित्र ट्विट केले होते. ‘आजच्या दिवसाने इतिहास रचला आहे. पंतप्रधानांनी सर्वांसमोर एक आदर्श घातला आहे’, असा संदेश मरिअमने ट्विटमध्ये लिहिला होता. चौकशी समितीसमोर हजर होण्यापूर्वी शरीफ यांनी सकाळी आपल्या कुटुंबीय आणि निकटच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती. तसेच त्यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना चौकशी समितीच्या कार्यालयाच्या परिसरात येण्यासही मनाई केली होती.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपर प्रकरणी २० एप्रिल रोजी JIT ची स्थापना केली होती. JIT ला पंतप्रधान, त्यांचा मुलगा आणि या प्रकरणाशी निगडीत कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे. शरीफ यांच्यावर विदेशात बेनामी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांनी हे आरोप फेटाळत निर्दोष असल्याचा दावा केला आहे. जेआयटीला ६० दिवसांत चौकशी पूर्ण करायची आहे.