पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्र्याकडून जशास तसेची भाषा 

दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या पुरस्कर्त्यांना कसला आलाय मानवी हक्क? त्यांच्या मानवी हक्काची चिंता करण्यापेक्षा सीमेवर लढणाऱ्या आणि दहशतवादाविरुद्ध जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचा मानवी हक्क अधिक मौलिक असल्याचे वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी बुधवारी केले. जशास तसे प्रत्युत्तर देऊन जम्मू काश्मीरचा प्रश्न कायमचा सोडविण्याची वेळ आता येऊन ठेपल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

जम्मू व काश्मीर भारतामध्ये विलीन झाल्याला सत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. सिंह बोलत होते. जम्मूजवळच्या उधमपूरचे खासदार असलेल्या सिंह यांनी अत्यंत आक्रमक भाषण यावेळेला केले. आपल्या भाषणात त्यांनी काश्मिरी फुटीरतावादी, देशविरोधी कारवाया करणारे आणि त्यांचे बौद्धिक समर्थन करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘भारतीय असल्याचे अभिमानाने म्हणवून घेण्यात संकोच कसला?’ असा सवाल त्यांनी केला.

दहशतवादी बुरहान वाणी मारल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे चिघळली आहे. त्याचा संदर्भ देत सिंह म्हणाले, ‘एका दहशतवाद्याच्या मानवी हक्काची चर्चा होते; पण आपल्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मानवी हक्कांचे काय? त्यांच्या आत्मसन्मानाशी देश आणि सरकार तडजोड करणार नाही. त्याचबरोबर कोणालाही देशाच्या सार्वभौमत्वाशी खेळ करू दिला जाणार नाही. जम्मू व काश्मीर आपलेच आहे, आपलेच राहील. खरे तर सत्तर वर्षांपासून पाकिस्तानने बळकावलेला आपला भूभाग परत मिळविण्याच्या दिशेने पावले टाकली पाहिजेत. जशास तसे वागण्याची हीच योग्य वेळ आहे.’

फुटीरतावादी नव्हे, राजकारणी!

दगड भिरकावण्यासाठी तरुणांना फुटीरतावादी मुद्दाम उद्युक्त करत असल्याचे सांगून जितेंद्र सिंह म्हणाले, ‘जर जवानांवर दगड भिरकावून ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळणार असेल तर मग हे फुटीरतावादी आपल्या मुलाबाळांना दगड फेकण्यासाठी का पाठवीत नाहीत? खरे तर फुटीरतावाद हा त्यांचा राजकीय व्यवसाय झाला आहे. ही मंडळी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतील सर्व फायदे उकळतात. लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री होतात आणि तरीदेखील कारवाया चालू ठेवतात.. अशा पोकळ फुटीरतावाद्यांबद्दल न बोललेलेच बरे.’