जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा हल्ल्याचा कट उधळून लावला. येथील रामपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता असून सध्या लष्कराकडून हा परिसर पिंजून काढला जात आहे. कालच उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) हल्ल्याचा प्रयत्न परतावून लावला होता. यावेळी भारतीय सैन्याने बॅटच्या दोन कमांडोंना ठार मारले होते. भारतीय लष्कराचे गस्ती पथक नियंत्रण रेषेनजीक गस्त घालत असताना त्यांना या भागातील पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) वावर लक्षात आला. त्यानंतर भारतीय जवानांनी लगेचच कारवाई करत त्यांना प्रत्युत्तर दिले. यामध्ये ‘बॅट’चे दोन कमांडो मारले गेले. भारतीय जवानांनी ठार मारलेल्या BAT मधील दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह LOC बेवारस अवस्थेत पडून होते.

गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवरील तणाव प्रचंड वाढला आहे. काही दिवसांपूर्वी पुंछ सेक्टरमधील कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानच्या बॅट टीमने घुसखोरी करत दोन भारतीय जवानांची हत्या केली होती. यावेळी पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबनाही केली होती. पाकिस्तानकडून बॉर्ड अॅक्शन टीमचा वापर नियंत्रण रेषेजवळ छापे टाकण्यासाठी केला जातो. पाकिस्तानी सैन्याचा स्पेशल सर्विस ग्रुप बॅटचा प्रमुख हिस्सा आहे. लपूनछपून छापे टाकणे आणि कोणत्याही मार्गांचा अवलंब करुन भारतीय सैन्याच्या वरचढ कारवाया करणे, ही जबाबदारी बॅटकडे असते. बॅटमध्ये पाकिस्तानी सैन्याबरोबरच दहशतवाद्यांचाही समावेश असतो. BAT ने यापूर्वी अनेकदा भारतीय जवानांचा शिरच्छेद करून त्यांच्या मृतदेहांची विटंबना केली आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताने दहशतवादास मदत करणाऱ्या पाकिस्तानी हद्दीतील चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ जारी केला होता. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. त्यानंतर पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या धमक्या द्यायला सुरूवात केली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून सातत्याने सीमारेषेवर घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र, भारतीय सैन्यही कमालीचे सतर्क असल्यामुळे या सर्व हल्ल्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जात आहे.