जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवणा-यांवर कारवाईचा इशारा भारतीय सैन्याने दिला असतानाच शुक्रवारी पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये पाक आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आले आहेत. जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली असून या घटनेने श्रीनगरमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते.

सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान जवानांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलले जातील. त्यांच्यावर देशविरोधी म्हणून कारवाई केली जाईल, असे वक्तव्य भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले होते. पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवणा-यांना सोडणार नाही असा दमही त्यांनी भरला होता. बिपीन रावत यांचे वक्तव्य ताजे असतानाच शुक्रवारी श्रीनगरमधील आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आले. जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर तरुणांच्या घोळक्याने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच सौम्य लाठीमारही केला.

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलेल्या विधानाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी समर्थन केले आहे. काश्मीरमधील प्रत्येक जण दहशतवाद्यांचा समर्थक आहे, असे लष्कर मानत नाही. पण जर लष्कराविरोधात कुणी काही करत असेल तर लष्कराच्या अधिकाऱ्यांना दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोकळीक देण्यात आली आहे, असे पर्रिकर यांनी ठामपणे सांगितले.