झारखंडमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असतानाच शुक्रवारी काँग्रेसने तेथील सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाशी (झामुमो) गेल्या जवळपास दीड वर्षांपासून असलेली आघाडी तोडली आहे.
झारखंडमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि जद(यू) समवेत काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी सांगितले. झारखंडमध्ये २५ नोव्हेंबरपासून पाच टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. झारखंडमधील अन्य छोटय़ा समविचारी पक्षांना काँग्रेस सोबत घेईल, असेही हरिप्रसाद म्हणाले.
झारखंडमधील काही मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास झामुमोने अनुकूलता दर्शविली नाही. तर काँग्रेसने ४५ जागांची मागणी केली असून झामुमोला त्यांच्या वाटय़ाच्या जागांमधून राजद आणि जद(यू)ला जागा देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे, असे कळेत.
आघाडी तोडण्याचा निर्णय अनुचित
रांची : झारखंडमधील सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाशी (झामुमो) असलेली आघाडी तोडण्याचा काँग्रेसचा निर्णय अनुचित असल्याचे झामुमोने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकांचा अनुभव घेतलेला असतानाही आघाडी तोडणे कितपत उचित आहे, असा सवाल झामुमोचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, झारखंड प्रदेश काँग्रेसने पक्षाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. झारखंडचा विकास हा आमचा कार्यक्रम होता, झामुमोचा नव्हे, असे प्रदेश सरचिटणीस आलोक दुबे यांनी म्हटले आहे.