राजकीय अस्थिरतेचा शाप असलेल्या झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय पेचप्रसंग उभा ठाकला आहे. सत्ताधारी भाजपचा पाठिंबा काढून घेत असल्याचा निर्णय सोमवारी झारखंड मुक्ती मोर्चाने जाहीर केला. त्यामुळे भाजप सरकार अल्पमतात आले आहे. ८२ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत भाजप व झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रत्येकी १८ आमदार आहेत.
भाजप व झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यात सरकार स्थापण्याच्या मुद्दय़ावरून अडीच-अडीच वर्षांचा करार झाला होता. भाजपचे नेते अर्जुन मुंडा यांना मुख्यंमत्रिपदासाठी झारखंड मुक्ती मोर्चाने पाठिंबा दिला. त्यांची मुदत १० जानेवारीला संपत आहे. २८ महिने सत्ता राबवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने त्यांना कराराची आठवण करून दिली असता त्यांनी अशा प्रकारचा कोणताच करार झाला नसल्याचे सांगत हात झटकले. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चाचे नेता व उपमुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पक्षप्रमुख शिबू सोरेने यांच्याशी व पक्षकार्यकर्त्यांशी चर्चा करत भाजपचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय
 घेतला.
सोमवारी त्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता भाजप सरकार अल्पमतात आले आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन भाजपने झारखंड मुक्ती मोर्चाला केले आहे.