कोसला ते हिंदू या उण्यापुऱ्या पाच दशकांच्या साहित्य प्रवासाने मराठी भाषेला उदाहरणार्थ समृद्ध वगैरे करणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी ज्ञानपीठ पुरस्कार समितीने त्यांच्या नावाची घोषणा केली आणि अवघे मराठीमानस आनंदून गेले. मराठी साहित्यविश्वाला देशीवादाची जाणीव करून देणाऱ्या या परखड विचारवंत-लेखकाला मिळालेल्या या पुरस्काराने तुकोबांच्या मराठीचाच गौरव झाल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.
सन्मानाची समृद्ध अडगळ
श्रेष्ठ कादंबरीकाराचा यथोचित सन्मान
राजकारणाला न जुमानता नेमाडेंना ज्ञानपीठ
‘आता कविता लेखन करणार’!
कोसला ते हिंदू व्हाया देशीवाद
ज्ञानपीठ म्हणजे काय रे भाऊ?
विशेष संपादकीय – तुकारामांच्या मराठीचा गौरव!
मराठी साहित्यातील योगदानाबद्दल नेमाडे यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचे ज्ञानपीठ पुरस्कार समितीचे अध्यक्ष नामवरसिंह यांनी नवी दिल्लीत जाहीर केले. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त होणारे नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक आहेत. यापूर्वी वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर आणि विंदा करंदीकर यांना हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला होता.

पुरस्कारामुळे आनंद झाला. ‘हिंदू’चे पुढील काही भाग लिहून तयार आहेत. ही शेवटची कादंबरी. आता यापुढे कादंबरी लेखन करणार नाही. कविता लेखन करणार.
भालचंद्र नेमाडे

आजवरचे संपूर्ण आयुष्य त्यांनी वाचन, मनन, चिंतन आणि लेखन यात घालविले आहे. जाहीर झालेला हा सन्मान म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या साहित्यसेवेवरील शिक्कामोर्तबच आहे. या सन्मानामुळे त्याचे चीज झाले. असामान्य बुद्धिमत्ता आणि सातत्याने ज्ञान मिळविण्याची त्यांची वृत्ती आजही कायम आहे. घरातही त्यांचे बोलणे रोखठोक असते.  
– प्रतिभा नेमाडे (नेमाडे यांच्या पत्नी)