मोदी सरकार सत्तेत आल्यापासून वादाचे केंद्र बनून राहिलेले दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जनरल व्ही.के. सिंह यांच्याकडे संस्थेच्या आवारात ठेवण्यासाठी लष्करी रणगाडा द्यावा, अशी मागणी केली. जेएनयूमध्ये हा रणगाडा ठेवला तर येथील विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याच्या बलिदानाचे सतत स्मरण होत राहील, असे एम जगदेश कुमार यांचे म्हणणे आहे.

सरकार ‘एफटीआयआय’सह देशातील ४२ स्वायत्त संस्थांचा ‘मेकओव्हर’ करण्याच्या तयारीत

९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांकडून उग्र निदर्शने करण्यात आली होती. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. यावरून अनेकजणांना अटकही झाली होती. हे प्रकरण देशभरात चांगलेच गाजले होते. त्यावेळी पहिल्यांदा जेएनयूमध्ये ‘राष्ट्रवादाचे प्रतिक’ म्हणून रणगाडा ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता विद्यापीठाचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनीच ही मागणी उचलून धरली आहे. जेएनयूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कारगिल विजय दिवस सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात धर्मेंद्र प्रधान, व्ही.के. सिंह, क्रिकेटपटू गौतम गंभीर, निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी, लेखक राजीव मल्होत्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एम जगदेश कुमार यांनी म्हटले की, भारतीय सैन्याने देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या बलिदानामुळे कारगिल विजय दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने मी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि व्ही.के. सिंह यांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी जेएनयूमध्ये लष्करी रणगाडा आणण्यासाठी आम्हाला मदत करावी. हा रणगाडा संस्थेच्या आवारात ठेवला जाईल. जेणेकरून या ठिकाणहून जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सैन्याच्या बलिदानाचे आणि उज्ज्वल परंपरेचे भान राहील, असे कुमार यांनी म्हटले.

रोहित वेमुला, जेएनयू आणि काश्मीरसंदर्भातले माहितीपट दाखवण्यावर केंद्राची बंदी