वाढत्या बेरोजगारीच्या पाश्र्वभूमीवर सरकारी रोजगार विनिमय केंद्रांच्या माध्यमातून तरी आपल्याला नोकरी मिळेल, या आशेने लाखो तरुण या केंद्रांमध्ये नावनोंदणी करीत असले तरी त्यातील सरासरी केवळ ०.५७ टक्के तरुणांनाच प्रत्यक्ष नोकरी मिळत असून, विविध राज्यांतील केंद्रांतून मिळणाऱ्या नोकऱ्यांची सरासरी एक टक्काही गाठू शकलेली नाही, असे आकडेवारीवरून उघड झाले आहे.

केंद्रीय कामगार मंत्रालयाची सन २०१५ मधील संबंधित आकडेवारी नोकऱ्यांची आवश्यकता व उपलब्धता यांतील अंतर स्पष्ट करणारी आहे. देशातील सर्व रोजगार विनिमय केंद्रे राष्ट्रीय रोजगार सेवा या पोर्टलला जोडली असून, सर्व राज्यांतील विनिमय केंद्रांची आकडेवारी या पोर्टलवर उपलब्ध होते. या केंद्रांकडून सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होतात. आजमितीला या पोर्टलशी १४.८५ लाख रोजगारदाते जोडले गेलेले आहेत. देशपातळीवर विचार करता या विनिमय केंद्राच्या माध्यमातून सन २०१५ मध्ये नोकरी मिळालेल्यांची सरासरी केवळ ०.५७ टक्के इतकीच आहे.

विविध राज्यांची तुलना केली असता, विनिमय केंद्रातून नोकरी मिळण्याचे सर्वाधिक प्रमाण गुजरातमध्ये आहे. गुजरातमधील रोजगार विनिमय केंद्रात नावनोंदणी करणाऱ्यांतील तब्बल ३० टक्के अर्जदारांना नोकऱ्या मिळाल्या, असे सन २०१५ची आकडेवारी सांगते. मात्र यातील मेख अशी की, मुळात विनिमय केंद्रात अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण गुजरातमध्ये खूपच कमी आहे. सन २०१५ मध्ये गुजरातमधून या केंद्रात केवळ ६.८८ लाख तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली होती. तर, तामिळनाडूमधील हाच आकडा तब्बल ८० लाख इतका होता. तो देखील वर्षांच्या प्रारंभीच्या नऊ महिन्यांतील आहे.

विनिमय केंद्रात अर्ज करण्यात तामिळनाडूखालोखाल पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ व महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. देशभरातील नावनोंदणीपैकी जवळपास ६० टक्के नावनोंदणी या पाच राज्यांतून झाली. मात्र या राज्यांतील विनिमय केंद्रांतून केवळ २७,६०० जणांनाच नोकरी मिळाली, असे आकडेवारी सांगते.

नोंदणीत दरवर्षी वाढ

रोजगार विनिमय केंद्रांच्या माध्यमातून नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण अत्यल्प असले तरीही तेथील नावनोंदणी मात्र दरवर्षी वाढतेच आहे. सन २०१२ मध्ये ४.४७ कोटी, सन २०१४ मध्ये ४.८२ कोटी, सन २०१५ मधील पहिल्या नऊ महिन्यांत ४.४८ कोटी अशी त्याची आकडेवारी आहे.