युद्धापेक्षा इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील संघर्षांच्या मागे दडलेल्या कारणांची उकल करणे मला अधिक योग्य वाटते. सध्या लढाईत गुंतलेल्या दोघांनी एकमेकांना जशास तसे उत्तर द्यावे, असे कोणाला वाटत असेल तर परिस्थिती अधिक गंभीर होईल आणि त्यातून बाहेर पडणे अधिक अवघड होऊन बसेल. त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी होण्यासाठी मी करत असलेल्या प्रयत्नांवरून माझ्यावर कोणी व्यक्तिगत टीका करणार असेल, तर त्याचे मला काही वाटत नाही, असे ठाम प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जॉन केरी यांनी बुधवारी केले.
राजकारणात याआधीही मी असे अनेक वार झेलले आहेत आणि मला त्याबद्दल चिंता वाटत नाही, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शस्त्रसंधीची सूचना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी माझ्याकडे केली होती. त्या दिशेनेच माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून हा वाद कोणी वैयक्तिक पातळीवर नेणार असेल तर मला त्याबद्दल खेद वाटत नाही.
गाझावरील इस्रायलचे लष्करी हल्ले थांबविण्यासाठी गेल्या आठवडय़ात केरी यांनी जोरदार प्रयत्न चालवले होते. यावरून इस्रायली नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून ते तीव्र टीकेचे लक्ष्य बनले होते. शस्त्रसंधीसाठी केरी यांच्या प्रयत्नांमुळे ज्यूंच्या राष्ट्राला धोका आहे आणि गाझावर नियंत्रण ठेवून असलेल्या ‘हमास’ या दहशतवादी संघटनेच्या कारवायांना कायदेशीर मान्यता देण्यासारखे आहे, असे त्यांच्या टीकाकारांनी स्पष्ट केले.
इस्त्रायलबाबतच्या धोरणाशी अध्यक्ष बराक ओबामा आणि मी एकाच दिशेने जात आहोत. त्यामुळे मला कोणाच्या टीकेची चिंता नाही, असे त्यांनी आपल्या टीकाकारांना बजावले.