सिनेटचे ज्येष्ठ सदस्य आणि २००४मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जॉन केरी यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदाची शपथ घेतली. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एलेना कागन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. हिलरी क्लिंटन यांच्यानंतर आता केरी हे काम पाहणार आहेत.
परराष्ट्रमंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाल्याचा विशेष आनंद वाटतो आहे. लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, या शब्दांत केरी यांनी शपथग्रहण सोहळ्यानंतर आपल्या भावना पत्रकारांना सांगितल्या. यावेळी त्यांची पत्नी तेरेसा हेन्झ, मुलगी वेनेसा, भाऊ कॅमरून उपस्थित होते.
केरी हे गेल्या तीन दशकांपासून अमेरिकेमध्ये सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते अमेरिकी सिनेटच्या परराष्ट्रसंबंध विषयक समितीचे अध्यक्ष होते.