महाराष्ट्रात सर्वाधिक जागा तर हरयाणात बहुमत मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाकरी फिरवली आहे. महाराष्ट्रासह इतर २८ राज्यांमध्ये नवे प्रभारी नेमण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी असलेल्या राजीव प्रताप रुडी यांच्या जागी राष्ट्रीय सरचिटणीस जे. पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभाविपमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या नड्डा यांना महाराष्ट्रासह राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील श्याम जाजू यांना उत्तराखंड, तर डॉ. विनय सहस्रबुद्धे यांना मध्य प्रदेशचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. रुडींकडे आंध्र प्रदेश व तामिळनाडूची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची कामगिरी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या ओमप्रकाश माथूर यांच्याकडे उत्तर प्रदेशचा पदभार देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०१७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभात झा यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे राजनाथ सिंह अध्यक्ष असताना झा यांच्याकडेच दिल्लीची जबाबदारी होती. गुजरातचे खासदार व मोदींचे निकटवर्तीय पुरुषोत्तम रुपाला यांना गोव्याचे प्रभारी नेमण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातसाठी अमित शहा यांनी डॉ. दिनेश शहा यांना प्रभारी नेमले आहे. महाराष्ट्रातील सुनील देवधर यांना त्रिपुरा, तर खा. पूनम महाजन यांना दीव-दमणची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.