काश्मीर हा वादग्रस्त प्रदेश नाही असे भासवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे निवडणुकांचे नाटक करीत आहेत. त्या निवडणुका म्हणजे फार्स आहे, असा आरोप जमात उद दवा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याने शुक्रवारी केला. काश्मिरी लोकांना भारतापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पाकिस्तानी जनेतेने पुढे यावे असेही चिथावणीखोर वक्तव्य त्याने केले.
सईद म्हणाला की, जर भारत अमेरिकेच्या मदतीसाठी अफगाणिस्तानात सन्य पाठवत असेल तर आम्हा मुजाहिद्दीनांनाही आमच्या  बांधवांना मदत करण्यासाठी काश्मीरमध्ये जाण्याचा अधिकार आहे. काश्मिरी लोक मदतीसाठी हाक देत आहेत व त्याला प्रतिसाद देणे पाकिस्तानी नागरिकांचे कर्तव्य आहे. मिनार ए पाकिस्तान येथे एका मदानात भरलेल्या जाहीर सभेत तो बोलत होता.  
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेला सईद पाकिस्तानात मोकाट फिरत आहे. त्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना असे बजावले की, काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार सोडवला पाहिजे, असे भारताला ठामपणे सांगावे, अन्यथा भारताला प्रेमाची भाषा समजत नसेल तर आपण काश्मिरी लोकांच्या स्वातंत्र्यलढय़ास खुलेआम पािठबा दिला पाहिजे असा सल्लाही त्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दिला.