संयुक्त राष्ट्र संघाने प्रतिकूल निर्णय दिल्यास शरणागतीची असांजची तयारी
आपण लंडनमधील इक्वेडोरच्या राजदूतावासात लपून काढलेली तीन वर्षे म्हणजे बेकायदेशीर स्थानबद्धता नव्हती असा निर्णय संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीने दिल्यास आपण ब्रिटिश पोलिसांना शरण जाऊ, असे ‘विकिलिक्स’चा संस्थापक ज्युलियन असांज याने म्हटले आहे.
ब्रिटन व स्वीडनविरुद्ध केलेला दावा मी हरलो असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने उद्या जाहीर केले, तर मी शुक्रवारी दुपारी दूतावासातून बाहेर पडेन आणि पुन्हा अपिल करून काही उपयोग नसल्यामुळे ब्रिटिश पोलिसांकडून अटक मान्य करेन, असे असांजने गुरुवारी सांगितले. मात्र, माझा दावा खरा ठरला आणि या दोन देशांची वर्तणूक बेकायदेशीर होती असे सिद्ध झाल्यास, माझा पासपोर्ट त्वरित परत मिळेल आणि मला अटक करण्याचे पुन्हा प्रयत्न होणार नाहीत अशी मी अपेक्षा करतो, असे ‘विकिलिक्स’ने ट्विटरवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
असांज (४४) याला इक्वेडोरने राजकीय आश्रय दिला असून, २०१२ पासून त्याला लंडनमधील आपल्या दूतावासात ठेवले आहे. स्वीडनच्या दोन महिलांनी असांजेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर आपले तेथील प्रत्यार्पण टाळण्यासाठी असांजने दूतावासात आश्रय घेतला. त्याने आपल्यावरील आरोप नाकारले आहेत.
आपल्याला अटक केल्याशिवाय आपण दूतावास सोडू शकत नाही, म्हणजेच आपल्याला ‘मनमानीपणे स्थानबद्ध’ करण्यात आले असल्याची तक्रार असांजने २०१४ साली संयुक्त राष्ट्र संघाला केली.
याउलट, असांजेने स्वेच्छेने कायदेशीर स्थानबद्धता टाळल्यामुळे अजूनही त्याचे प्रत्यार्पण करणे हे आपले कर्तव्य आहे, असा दावा ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाने केला होता. निरंकुश स्थानबद्धतेबाबत संयुक्त राष्ट्र संघाचा कार्यगट असांजेच्या प्रकरणातील तपासाचे आपले निष्कर्ष शुक्रवारी जाहीर करणार आहे.
असांजेने २००६ साली स्थापन केलेल्या ‘विकिलिक्स’ने अफगाणिस्तान व इराकशी झालेल्या युद्धाशी संबंधित ५ लाख गोपनीय लष्करी फाईल्स आणि अडीच लाख राजनैतिक तारा (केबल्स) जारी केल्यामुळे अमेरिकेची नाचक्की झाली होती. ही माहिती पुरवणाऱ्या अमेरिकन सैनिकाला हेरगिरी कायद्याचा भंग केल्याबद्दल ३५ वर्षांची शिक्षा झाली असल्यामुळे, आपण स्वीडनला गेल्यास आपल्यालाही या ‘माहितीफुटीच्या’ संदर्भात अमेरिकेत पाठवले जाऊ शकते अशी असांजला भीती आहे.