अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएची अनेक गुपिते उघड करणाऱ्या ‘विकिलीक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज सध्या लंडनमधील इक्वेडोरच्या वकिलातीत मुक्काम ठोकून आहेत. त्यांना हृदयविकाराचा त्रासही होत आहे. मात्र या वकिलातीतून बाहेर पडल्यानंतर आपल्याला अमेरिकेच्या हवाली करण्यात येणार नाही, अशी हमी मिळेपर्यंत ते या वकिलातीतच राहणार आहेत
आपल्याला हृदयविकाराचा त्रास होत असून लवकरच या वकिलातूनमधून आपण बाहेर पडू, असे निवेदन असांज यांनीच सोमवारी रात्री केले होते. त्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या वकील जेनिफर रॉबिन्सन यांनी मंगळवारी या संदर्भात स्पष्टीकरण केले. इक्वेडोरच्या वकिलातीमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला अमेरिकेच्या हवाली केले जाणार नाही, अशी हमी मिळेपर्यंत ते बाहेर पडणार नाहीत, असे जेनिफर यांनी एबीसी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. सुमारे दोन वर्षांपूर्वी असांज यांच्यावर स्वीडनमध्ये बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून असांज यांनी इक्वेडोरच्या वकिलातीत आश्रय घेतला आहे. आपल्याला स्वीडनच्या हवाली केल्यास तेथून आपली रवानगी अमेरिकेत केली जाईल आणि अमेरिकेत नेले गेले तर विकिलीक्ससंदर्भात आपल्यावर खटला चालवला जाईल, अशी भीती असांज यांना वाटत आहे.