जून महिन्याच्या तिसाव्या दिवशी म्हणजे तीस जूनला एक सेकंद जास्त असणार आहे, त्याला लीप सेकंद म्हणतात असे नासाने म्हटले आहे.
पृथ्वीचे भ्रमण अगदी कमी प्रमाणात हळू होत आहे त्यामुळे लीप सेकंदाने वेळेची तडजोड करावी लागते, असे नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे डॅनियल मॅकमिलन यांनी सांगितले.
थोडक्यात ३० जून हा दिवस आज ८६,४०० सेकंदांचा असणार आहे, असे समन्वित वैश्विर वेळ संस्थेच्या वेळ प्रमाणकानुसार सांगण्यात आले. यूटीसी ही आण्विक वेळ यात प्रमाण मानली जाते त्यानुसार अणुघडय़ाळ हे सेसियमचे असते. त्यामुळे विद्युत चुंबकीय बदल हे एक सेकंद जास्त दर्शवित आहेत. हे बदल अचूक आहेत. कारण अणुघडय़ाळ १४ लाख वर्षांत एक सेकंद मागे पुढे होऊ शकते. असे असले तरी  सौर दिनाची सरासरी लांबी ही पृथ्वीच्या भ्रमणास किती काळ लागतो त्यावर अवलंबून असते. म्हणजे ३० जून हा दिवस ८६४००.००२ सेकंद लांब असणार आहे. याचे कारण पृथ्वीचे भ्रमण कमी होत चालले आहे. पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यात गुरुत्वाकर्षण युद्ध चालू असते त्यामुळे काही गुरुत्वीय बदल परिणाम करीत असतात. वैज्ञानिकांच्या मते १८२० पासून कधीही ३० जून हा दिवस ८६,४०० सेकंदांचा नव्हता. आता २ मिलिसेकंदांचा फरक पडला असून तो सेकंदाच्या  वीसहजारांश भाग आहे. अगदी डोळ्याची पापणी हलण्यास जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा हा कमी काळ आहे.  पृथ्वीचे भ्रमण सरासरी वेगाने कमी होत असले तरी प्रत्येक दिवसाचे सेकंद भाकिताने सांगणे कठीण असते.
दिवसाची लांबी ही अनेक घटकांवर अवलंबून असते त्यात वातावरणाचाही भाग असतो. लीप सेकंद हा ३० जून किंवा ३१ डिसेंबरला वाढवला जातो. त्यात घडय़ाळ २३.५९.५९ वरून पुढच्या दिवशी ००.००.०० केले जाते. लीप सेकंदामुळे ३० जूनला यूटीसी २३.५९.५९ वरून २३.५९.६० केले जाईल व त्यानंतर १ जुलैला ००.००.०० वेळ सुरू होईल. प्रत्यक्षात अनेक प्रणाली एक सेकंद बंद कराव्या लागतील. १९७२ पासून लीप सेकंदाची अंमलबजावणी सुरू झाली ती १९९९ पर्यंत चालू होती. त्यामुळे वर्षांला एक सेकंद वाढत होता. आता लीप सेकंद फारसे नाहीत. या जूनमधील लीप सेकंद २००० पासून चौथे आहे.