बिहारमध्ये भाजपची जनता दल (संयुक्त)शी असलेली युती तुटल्यानंतर तेथे ‘जंगल राज-२’ आले असल्याची टीका करतानाच, या वर्षांअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे लोक भाजपलाच जनादेश देतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
भाजप व जद(यू) यांचा काडीमोड झाल्यानंतर काय बदल झाला असेल, तर बिहारमध्ये जंगल राज-२ परत आले आहे. यामुळे राज्यातील लोक संतप्त आणि अस्वस्थ आहेत. त्यांना भाजपच्या नेतृत्वातील नवे सरकार हवे आहे, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळाची भाजप-जद(यू) युती सरकारकडून ‘जंगल राज’ म्हणून टर उडवली जात होती. मात्र लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्यानंतर जद(यू) व राजद यांनी एकत्र येऊन भाजपला समान शत्रू ठरवले आहे.
युती तोडून जद(यू)ने जनादेशाचा अपमान केला आहे, अशा शब्दात शाह यांनी या पक्षावर हल्ला चढवला. गेल्या निवडणुकीत भाजप व जद(यू) यांची युती असल्याने आम्हाला कौल दिला, परंतु त्याचा अपमान करून जनता दलाने युती तोडली असा आरोप केला.

जनता दलाचे प्रत्युत्तर
भाजपने कितीही आरोप केले तरी निवडणुकीत त्यांना लाभ होणार नाही, असा दावा जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केला आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली आहेत काय, याचे उत्तर आधी द्यावे अशी मागणी यादव यांनी केली.