भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली. काँग्रेस पक्षाला आजपर्यंतच्या प्रत्येक क्षणाची किंमत मोजावी लागेल असे सांगत मोदींनी काँग्रेस पक्षाला टीकेचे लक्ष्य केले. गुजरात राज्यातील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातील आपल्या भाषणात  काँग्रेस पक्षाने सरदार पटेलांचा अपमान केला आहे, आणि मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असे मोदींनी गुजरात राज्यातील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातील आपल्या भाषणात सांगितले. काँग्रेसकडून प्रत्येक क्षणाचा हिशोब घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काँग्रेसच्या हातचे बाहुले असणारी सीबाआयसुद्धा मला काही करू शकत नाही. अजून फक्त २० दिवस आहेत, त्या काळात मला जितके छळायचे तेवढे छळा, लढाईच्या मैदानात मी अजूनही तुमच्यासमोर उभा आहे अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. सोनिया आणि राहुल यांचा आगामी गुजरात दौरा हा जनतेची दिशाभूल करण्यासाठी असल्याची टीका मोदींनी यावेळी केली. तसेच जनता काँग्रेस पक्षाची पाठवणी करणार हे निश्चित आहे, तेव्हा त्यांनी हसऱ्या चेहऱ्याने पाठवणीला सामोरे जावे असे मोदींनी सांगितले.