अत्यंत आक्रमक शैलीत केलेल्या भाषणात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणावरून भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ‘शेरनी’ असल्याचा उल्लेख करून तुम्ही त्यांना घाबरत असल्याचे सत्ताधाऱ्यांना सुनावले.
ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणावरून शुक्रवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि निशिकांत दुबे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आणि सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणाशी संबंधित एकाही अधिकृत कागदपत्रामध्ये कुठेही सोनिया गांधी यांचे नाव नाही. तरीही भाजपकडून त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत.
श्रीमती गांधी आणि त्यांचे जवळचे सल्लागार यांचा उच्चायुक्तांनी आदर करावा, अशा या व्यक्ती आहेत, असे या ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीचे भारतातील एक अधिकारी पीटर हुलेट यांनी एका पत्रात लिहिले असल्याचे त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
आपण कधीही गांधी परिवारातील कोणालाही भेटलो नसून, त्यांच्याशी कधीही संवाद साधलेला नाही. गांधींना या व्यवहारात एकही पैसा देण्यात आलेला नाही असे आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी या व्यवहारातील मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेल यांच्या हवाल्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2016 रोजी प्रकाशित
सोनिया गांधी ‘शेरनी’, सत्ताधारी त्यांना घाबरतात – ज्योतिरादित्य शिंदे
ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणावरून शुक्रवारी लोकसभेत चर्चा झाली
Written by लोकसत्ता टीम

First published on: 06-05-2016 at 17:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyotiraditya scindia says sonia gandhi is sherni