तेलंगणातील वाढत्या अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी राव यांच्या दिमतीला तब्बल ५ कोटी रूपये किंमतीची व्हॅनिटी बस तैनात करण्यात आली आहे. संभावित दहशतवादी हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन ही बस तयार करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार या बसमध्ये शयनगृह, विश्रांती आणि बैठकीसाठी वेगवेगळ्या खोल्या असून इतर अनेक सुरक्षा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, हा केवळ पैशांचा अपव्यय असल्याची टीका आता विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वीच के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी सरकारकडून बुलेटफ्रुफ स्कॉर्पिओ गाडी तैनात करण्यात आली होती. तेलंगणा सरकारने भारत डायनॅमिक्स लिमिटेकडून मुख्यमंत्र्यांसाठी तयार करून घेतलेल्या या गाडीत उच्च दर्जाच्या अनेक सुरक्षा सुविधा आहेत. या गाडीत मुख्यमंत्र्यांबरोबर अत्याधुनिक शस्त्रे असलेले चार पोलीस असतील. आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास हे पोलीस गाडीच्या आतमध्ये राहुनच गोळीबार करू शकतील, अशी व्यवस्था या गाडीत करण्यात आली होती. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात १.३९ कोटी रूपये किंमतीच्या दोन भू-सुरुंगविरोधी कवच असणाऱ्या टोयोटा लँड क्रुझर, ७७,५६ लाखांच्या चार बुलेटफ्रुफ फॉर्च्युनर कार आणि एका रूग्णवाहिकेचा समावेश करण्यात आला होता.