उत्तर प्रदेशमधील रेल्वे अपघातांचे शुक्लकाष्ठ अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच खतौली येथे उत्कल एक्स्प्रेसला झालेल्या भीषण अपघातानंतर बुधवारी पहाटे आणखी एक दुर्घटना घडली. येथील औरेया जिल्ह्यात बुधवारी पहाटे कैफियत एक्स्प्रेस रूळांवरून घसरली. यामध्ये तब्बल ४० प्रवासी जखमी झाले आहेत. अद्यापपर्यंत या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आज पहाटे २.४० च्या सुमारास कैफियत एक्स्प्रेस डंपरला धडकली. त्यानंतर या एक्स्प्रेस गाडीचे इंजिन व दहा डबे रुळांवरून खाली घसरले. यामध्ये एक्स्प्रेसने प्रवास करणारे ४० प्रवासी जखमी झाले. या जखमींना नजीकच्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच येथील बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) औरेयाच्या दिशेने रवाना झाले आहे. काही वेळातच हे पथक घटनास्थळी पोहचेल. कैफियत एक्स्प्रेस ही आझमगढ ते नवी दिल्ली या रेल्वे मार्गावर धावते.

तीन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या खतौली येथे कलिंगा उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रूळांवरून घसरून भीषण अपघात झाला होता. या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला होता तर १२ लोक जखमी झाले होते. यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अपघाताची ताबडतोब चौकशी करून सकृतदर्शनी पुराव्यांच्या आधारे जबाबदारी आजच्या आज निश्चित करून अहवाल सादर करा, असे आदेश दिले होते. या अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातामुळे उत्तर प्रदेशातील रेल्वे मार्गांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वेमार्ग निगा व दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे उत्कल एक्स्प्रेसला अपघात झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष रेल्वे अपघाताच्या चौकशीत काढण्यात आला होता. तर कैफियत एक्स्प्रेसचा अपघात हा डंपरला धडकल्यामुळे झाला. रेल्वे अपघात कमी करण्यासाठी लेव्हल क्रॉसिंग काढून टाकणे आणि मानवविरहीत फाटक अशा उपाययोजनांची देशभरात अंमलबजावणी केल्याचा दावा वारंवार रेल्वे खात्याकडून केला जातो. मात्र, तरीही हा डंपर कैफियत एक्स्प्रेसच्या मार्गात आलाच कसा, अशी शंका निर्माण झाली आहे.