कैलास मानसरोवर यात्रेसाठी यात्रेकरूंची निवड ऑनलाईन पद्धतीने केली जात असून आज पहिली सोडत काढण्यात आली. केंद्रीय मंत्री निवृत्त जनरल व्ही.के.सिंग यांनी ऑनलाइन सोडतीस प्रारंभ केल्यानंतर सांगितले की, ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएस किंवा इमेल पाठवण्यात येतील. आम्ही मानवी पातळीवर नावे निवडणार नाही तर संगणक ती निवडत आहे. परराष्ट्र कामकाज खात्याकडून काढल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेच्या सोडतीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीय पद्धतीचा वापर केला जात आहे. हाज यात्रेसाठीही संगणकीय सोडत काढली होती. यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कैलास मानसरोवर यात्रा जूनपासून सुरू होत आहे. मंत्रालयाचे सहसचिव प्रदीप रावत यांनी सांगितले की, यावर्षी २६०० अर्ज आले होते त्यातील २४०० योग्य होते व त्यात ८७ डॉक्टरांचा समावेश आहे. प्रत्येकी ६० यात्रेकरू याप्रमाणे १८ तुकडय़ा लिपुलेख खिंडीच्या मार्गाने जाणार आहेत. प्रत्येकी ५० यात्रेकरू याप्रमाणे एकूण सात तुकडय़ा नाथू ला खिंडीच्या मार्गाने जाणार आहेत. यातील लिपुलेख खिंडीचा मार्ग हा जास्त अवघड मानला जातो. संगणकीय सोडतीत एकदा यादी तयार झाली की त्यात काही बदल करता येत नाही. यावेळी आम्ही यात्रेकरूंकडून ऑनलाईन सूचना मागवल्या आहेत व त्यामुळे समस्यांची उत्तरे शोधता येतील असे रावत यांनी स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीचे नाव अमुक एका तुकडीत असेल व तिला ती बदलून हवी असेल तर तसे करता येईल.