‘भारतरत्न’ माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना लाखोंच्या जनसमुदायाने शोकाकुल वातावरणात गुरुवारी अखेरचा निरोप दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू, तामिळनाडूचे राज्यपाल के. रोशय्या, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांचे नेते अंत्यविधीवेळी रामेश्वरमपासून जवळच असलेल्या पेईकरूम्बू येथे उपस्थित होते. दफनविधीपूर्वी मोदी यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर त्यांनी कलाम यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तिन्ही सेनादलांचे प्रमुखही अंत्यविधीवेळी उपस्थित होते. लष्करी इतमामात झालेल्या अंत्यविधीवेळी लष्कराच्या जवानांकडून बंदुकीच्या फैऱया झाडून सलामी देण्यात आली.
गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास रामेश्वरम येथून फुलांनी सजविलेल्या गाडीतून कलाम यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. पेईकुरुम्बू येथे दफनविधी करण्यात आले. ५४ वर्षांच्या गणेशन यांनी दफनविधीसाठी तयारी केली आहे. आपल्या भूमीतील लाडक्या सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अंत्यविधीवेळी लाखोंचा जनसागर लोटला होता. ‘कलाम सर अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
विज्ञानेश्वराचे प्रस्थान
कलाम यांचे पार्थिव घेऊन आलेले हेलिकॉप्टर मंडपमजवळ एका हेलिपॅडवर बुधवारी सायंकाळी चार वाजता उतरले. त्याआधी त्यांचे पार्थिव खास विमानाने मंगळवारी नवी दिल्लीहून मदुराईला आणण्यात आले होते. कलाम यांचे पार्थिव रात्री आठ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. त्यानंतर ते कलाम यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर ते पार्थिव पल्लीवसल रस्त्यावरील वडिलोपार्जित घरी नेले गेले. तेथेच कलाम लहानाचे मोठे झाले. तेथे धार्मिक विधी केल्यानंतर त्यांचे पार्थिव स्थानिक मशिदीतही नेण्यात आले होते