विश्वरुपम चित्रपटावर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर आता त्याच्या प्रदर्शनावरून सुरू असलेल्या गोंधळाने प्रख्यात अभिनेता कमल हसन कमालीचा नाराज झाला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बुधवारी कमल हसन भावनाविवश झाला. भारतामध्ये धर्मनिरपेक्षपणे वागणूक मिळत नसेल, तर देश सोडून जाण्याचा मार्ग पत्करावा लागेल, असे त्याने म्हटले आहे.
विश्वरुपमच्या निर्मितीसाठी मी आणि माझ्या भावांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यात विनाकारण अडथळे आणले जात असल्यामुळे आमचे नुकसान होते आहे. जर मी वेळेत देणेकऱयांचे पैसे दिले नाही, तर मला माझ्या घराला मुकावे लागेल. या वास्तूशी माझे वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत. विश्वरुपमच्या माध्यमातून आणखी एक गोड आठवण या वास्तूशी जोडली जाईल, असे मला वाटले होते. पण तसे होताना दिसत नाही, या शब्दांत कमल हसनने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
कमल हसन म्हणाला, विश्वरुपमवरून विनाकारण घातला गेलेला गोंधळ थांबला नाही, तर एम. एफ. हुसेन यांच्याप्रमाणे मी पण देश सोडून जाईन आणि पुन्हा परतणार नाही. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुद्दा न्यायालयात दाखल आहे. त्यामुळे मी आणखी काही बोलणार नाही. मला कोणालाही बदनाम करायचे नाही. मी खूप छोटा माणूस आहे. मात्र, या सगळ्या षडयंत्रामागे कोणती व्यक्ती आहे, हे तुम्हाला माहिती आहे.